अहमदाबाद: विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला जे स्थान प्राप्त करून दिले आहे, तिथून आता संघाला आगेकूच करायची आहे, असे भारताचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्माने सांगितले. सन २०२१ मध्ये रोहितने विराटच्या जागी कसोटी कर्णधारपदाची धुरा स्वीकारली आहे. विराट टी-२० कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर एकदिवसीय क्रिकेट कर्णधारपदावरूनही त्याला हटवण्यात आले.
विराट जेव्हा कर्णधार होता, तेव्हा मी उपकर्णधार होतो. प्रत्येक खेळाडूला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, याची जाणीव आहे. विराटच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला भारतीय क्रिकेटचा विजयरथ आम्हाला पुढे न्यायाचा आहे, असे रोहितने आभासी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्हाला खूप काही बदलण्याची गरज नाही. फक्त जुळवून घेण्याची क्षमता आणि सतत प्रयोगशील राहणे आवश्यक आहे. मी कर्णधारपद स्वीकारल्यावर लगेचच माही मोठे बदल होतील, असे नाही, असेही त्याने स्पष्ट केले. कसोटी कर्णधारपद मिळण्याच्या शक्यतेबद्दल रोहितला विचारले असता, त्यासाठी आणखी वेळ आहे, असे तो म्हणाला. माझे लक्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर आहे. ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ महत्त्वाचे आहे. काही मालिका गमावू शकतो हे लक्षात घेऊनही आम्हाला खेळाडू बदलत राहण्याची गरज आहे. आम्ही त्यासाठी तयार आहोत, असेही रोहित म्हणाला.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत आणि वेस्ट इंडिज यांची लढत होणार आहे. पहिला सामना ६ फेब्रुवारी, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे ९ आणि ११ फेब्रुवारीला होईल. त्यानंतर १६, १८ आणि २० फेब्रुवारीला ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणार्या तीन टी-२० सामन्यांसाठी संघ कोलकात्यात जातील.