
नवी दिल्ली: प्रतिनिधी
जगातील नामांकित कार उत्पादन कंपनी टेस्ला भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी उत्सुक असून त्यासंदर्भात कंपनी आणि सरकार यांच्या चर्चा सुरू असल्याची माहिती उद्योग विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. नियोजित उत्पादन प्रकल्पामध्ये प्रामुख्याने विजेवर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात टेस्ला कंपनीचे संचालक एलन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान भारतात कार उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात कंपनीला रस असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीसाठी सरकार आणि कंपनी यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
भारताला बनविणार प्रमुख निर्यात केंद्र
कंपनीचा नियोजित उत्पादन प्रकल्प वर्षाला पाच लाख वाहनांचे उत्पादन करण्याच्या क्षमतेचा असणार आहे. या प्रकल्पात तयार केल्या जाणाऱ्या विजेवर चालणाऱ्या कारची किंमत सुमारे वीस लाख रुपये एवढी असेल. भारतात तयार केल्या जाणाऱ्या वाहनांची देशांतर्गत विक्री करण्याबरोबरच प्रामुख्याने भारताला कंपनीचे मुख्य निर्यात केंद्र बनविण्याचा टेस्लाचा मानस आहे. भारतामधून हिंद प्रशांत महासागर टापूत असलेल्या देशांमध्ये भारतातील उत्पादन प्रकल्पात तयार झालेल्या वाहनांची निर्यात करण्याचा कंपनीचा विचार आहे.