नवी दिल्ली: प्रतिनिधी
नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तीन राज्यात विजय प्राप्त केला असून त्या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदावर प्रस्थापितांना विराजमान करण्याऐवजी नव्या चेहेऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा विचार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उपयुक्तता हा त्यासाठी प्रमुख निकष असणार आहे, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. धक्कातंत्र हा मोदी-शहा यांच्या राजकारणाचा अविभाज्य घटक असल्याने मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात भाजपने निर्भेळ यश प्राप्त केले आहे. लोकसभा निवडणूक दाराशी येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर या राज्यांचे मुख्यमंत्री पद कोणाकडे सोपवावे, याबाबत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विचार विमर्श केला जात आहे. त्या दृष्टीने मंगळवारी तब्बल साडेचार तास पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते.
या बैठकीपूर्वी अमित शहा आणि नड्डा यांनी पक्षाच्या तिन्ही राज्यातील निरीक्षकांशी चर्चा करून मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असलेल्या संभाव्य नेत्यांच्या नावांच्या याद्या तयार केल्या आहेत. लवकरच तिन्ही राज्यांमध्ये पर्यवेक्षकांची नियुक्ती करून त्यांच्याद्वारे आमदारांशी चर्चा करण्यात येईल आणि मुख्यमंत्री निवडीबाबत त्यांची मते जाणून घेण्यात येतील.
मध्यप्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेतच. त्याशिवाय केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रल्हाद पटेल यांचाही मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे नावही चर्चेत आहे.
राजस्थानमध्येही अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. सर्वाधिक चर्चा माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील प्रभावी नेत्या वसुंधरा राजे यांच्या नावाची आहे. त्याच बरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल आणि प्रदेशाध्यक्ष सी पी जोशी हे देखील पदाचे प्रमुख दावेदार आहेत. याखेरीज महंत बालकनाथ आणि दिया कुमारी यांच्याकडे देखील संभाव्य मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे.
छत्तीसगडमध्ये रमणलाल हे आतापासूनच मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या अविर्भावात वावरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अरुण कुमार साव, धर्मालाल कौशिक आणि माजी सनदी अधिकारी ओ पी चौधरी यांची नावेही मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत.