पुणे: प्रतिनिधी
मराठी अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत भारतीय जनता पक्षाने फूट पाडली. इतर पक्षाच्या नेत्यांनी याबाबत भाष्य न करता आपापसात भांडत राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. आम्ही एकमेकात भांडत बसलो आणि ते दुरून मजा बघत आहेत. मात्र भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात रोष निर्माण झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली.
जनता सगळे समजून आहे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत अजित पवार यांना खलनेता बनविण्याचे काम सुरू आहे. अजित पवार यांचा निर्णय लोकांना पटलेला नाही. मात्र, पक्षात खरी फूट कोणी पाडली आणि राजकारणाची पातळी कोणी खाली आणली याबाबतचे सत्य जनता समजू नाही. मतदार हे कृत्य कधीही विसरणार नाहीत, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
बंडखोर नेत्यांच्या कोलांटी उड्या
आज अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी यापूर्वी आत्तापर्यंत भाजपच्या धोरणांना विरोध केला आहे. भाजपवर कठोर टीका करणारी भाषणेही केली आहेत. आता मात्र त्यांनी भूमिका बदलत कोणती उड्या मारल्या आहेत, अशी टीका पवार यांनी केली.