पुणे: प्रतिनिधी
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचच्या छातीत धडकी भरली आहे. निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीका केली.
काँग्रेसची महत्त्वाची आढावा बैठक येथे पार पडली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणूक व्यक्ती केंद्री बनविण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला काही प्रमाणात यश येत आहे. मात्र, भाजपकडून पक्षाच्या जागा वाढण्याचे केले जाणारे दावे अतिरंजित आहेत. मतदारसंघांचा आढावा घेतला असता भाजपच्या जागा वाढण्याची कोणतीही शक्यता नाही, असा दावा चव्हाण यांनी यावेळी केला.
मोदी यांनी सन २०१४ ची निवडणूक आर्थिक मुद्द्यावर लढवली. सन २०१९ मध्ये बालाकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर निवडणूक लढवली. या वर्षात होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर कोणताही मुद्दा नसल्यामुळे त्यांनी राम मंदिराचा ‘इव्हेंट’ घडवून आणला अशी टीका करून चव्हाण पुढे म्हणाले की, अयोध्येत उभारण्यात आलेले राम मंदिर मूळ जागेपासून चार किलोमीटर दूर आहे. त्या ठिकाणी मूळ मूर्ती कुठे आहे? नव्या मूर्ती कशा आल्या? मंदिराचे काम अर्धवट असल्यामुळे शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला विरोध केला. कदाचित त्यामुळे ज्योतिषाला विचारून पुढील अरिष्ट टाळण्यासाठी मोदी यांनी उपवास केले, जमिनीवर झोपले. मात्र, जे घडायचे ते घडणारच, अशा शब्दात चव्हाण यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली.
महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी अपेक्षाही केली नसेल एवढे मोठे राजकीय भूकंप होतील, या गिरीश महाजन यांच्या विधानाचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. सत्ताधारी गोटाकडून उगीचच ‘या पक्षातून हा येणार, त्या पक्षातून तो येणार,’ अशा वावड्या उठवण्याचे काम चालू आहे. प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस नाही, असेही चव्हाण म्हणाले.