चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकिचा प्रचार जोमात सुरू असतानाच भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. पिंपळे निलख येथील भाजपचे अत्यंत प्रभावी आणि आक्रमक माजी नगरसेवक तुषाक कामठे यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, दोन दिवसांत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी कामठे यांनी लेखी पत्राद्वारे आपण भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कळविले आहे. राजीनाम्याचे कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
महापालिकेत २०१७ ते २०२२ पर्यंत भाजपची सत्ता असताना भ्रष्टाचाराची मोठमोठी प्रकरणे कामठे यांनी बाहेर काढल्याने खळबळ उडाली होती. स्मार्ट सिटी प्रकल्प, कोरोना काळातील खरेदी, ३६ कोटी रुपयांत एक किलोमीटरचा अर्बन स्ट्रीट पदपथ, रोड स्विपिंग कंत्राट घोटाळा, वायसीएम मध्ये ६० लाखाची मशिन दोन कोटींना खरेदीचे प्रकरण अशा अनेक प्रकरणांवर त्यांनी मोठ्या धाडसाने आवाज उठविला होता. महापालिका सभागृहातसुध्दा त्यांनी या विषयांवर चर्चा घडवून आणल्याने भाजपची कोंडी झोली होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात जाऊन त्यांनी या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश केल्याने कामठे हे चर्चेत होते. आता त्यांनी थेट राष्ट्रवादीशी संधान बांधल्याने पिंपळे निलख परिसरात भाजपच्या मतांवर परिणाम संभवतो.