सोलापूर: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत दोन वेळा आपला पराभव झाला असला तरीही आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पक्षात येण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला ऑफर मिळाल्याचा दावा करतानाच काहीही झाले तरी काँग्रेस सोडणार नाही, अशी ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हुरडा पार्टीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ज्या आईच्या कुशीत आपण लहानाचे मोठे झालो तिला सोडून दुसरीकडे जाणे शक्य नाही. प्रणिती यादेखील पक्ष बदलाचा विचार करणार नाहीत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षासाठी सध्याचे दिवस काही प्रमाणात प्रतिकूल असले तरीही ही स्थिती कायम राहणार नाही. सर्वसामान्य जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे आणि पक्षाला पाठिंबा आहे. याच भांडवलावर काँग्रेसला पुन्हा वैभवाचे दिवस येतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, लहान मूल चालता चालता पडते. पुन्हा उठते आणि चालायला लागते. तसेच पराभवातून तावून सुलाखून माणूस यशापर्यंत पोहोचू शकतो, अशी पंडितजींची भूमिका होती, असेही शिंदे यांनी सांगितले.
शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांचे पक्षश्रेष्ठींकडे मोठे वजन आहे. त्यांनी आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पद, केंद्रीय गृहमंत्री पद, राज्यपाल पद अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सोलापूर परिसरात शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कन्या प्रणिती यादेखील आमदार आहेत.