कर्नाटकातील हिजाब वादात प्रियंका यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली: कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही उडी घेतली आहे. प्रियांकाच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याचीही शक्यता आहे. महिलांनी बिकिनी घालायची की हिजाब हा त्यांचा निर्णय आहे. त्यात इतरांनी पडायचे कारण नाही, असे मत प्रियंका गांधी यांनी बुधवारी सांगितले. मलाही या प्रकरणी कोणालाही कोणताही सल्ला देण्याचा अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या.
शाळा महाविद्यालयात विद्यार्थिनींना हिजाब न वापरण्याचा नियम कर्नाटक सरकारने केला आहे. या नियमावरून मोठे वादळ उठले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा मुद्दा आता न्यायालयातही पोहोचला आहे.
यापूर्वी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाई हिनेही समाजमाध्यमातून या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे दुर्लक्ष करू नये. हिजाब परिधान करतात म्हणून मुली-महिलांना शाळा महाविद्यालयात जाऊ न देणे हे भयानक आहे. कमी जास्त कपडे घालण्यावरून महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवता काम नये, असे आवाहन तिने केले आहे.
दरम्यान, कर्नाटकात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यास बंदीचा वाद अधिकच चिघळला आहे. कर्नाटक उच्च बयायालयात हिजाब प्रकरणाशी संबंधित याचिकांच्या सुनावणीपूर्वी बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग, बागलकोट येथे तीव्र आंदोलने केली जात आहेत. काही विद्यार्थी हिजाब आणि भगवे स्कार्फ घालून शैक्षणिक संस्थांच्या आवारात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे शैक्षणिक संस्थांच्या आवारात हिजाब आणि भगव्या स्कार्फवर बंदी घातली आहे.