१२ डिसेंबर २०२२ रोजी पवना नदीवरील थेरगाव येथे असलेल्या केजुबाई बंधारा येथे मोठ्या प्रमाणात मासे मृत आढळले.त्या अनुषंगाने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाच्या अभ्यास गटाने दिनांक १३ डिसेंबर २०२२ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातुन वाहत असलेल्या पवना नदीच्या परिसरातील प्रमुख ठिकाणी पाहणी केली.त्या पाहणीमध्ये काही महत्वाचे मुद्दे प्रकर्षाने सामोरे आले. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना घाळी, विजय मुनोत, गौरी सरोदे, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, अँड विद्या शिंदे, संतोष चव्हाण, ओंकार पाटील या अभ्यास गटाने पाहणी मध्ये सहभाग घेतला.
पवना नदी – सह्याद्रीच्या लोहगड व तुंग किल्याच्या खोऱ्यात उगम पावणारी व पुढे मुळा नदीत मिळणारी साधारण ५२ किमी लांबीची नदी असून पवनानगर परिसरातील गेव्हंडे,आतवंण, आपटी गावांच्या हद्दीतून तिची सुरुवात होते.काले परिसर, कोथुर्णे, येळसे,शिवली,कडधे, करंज,थुगाव,बवुर,सडवली,ओझर्डे, शिवणे, उर्से गावातील साधारण २८ किमीटरच्या परिसरात नदी प्रदूषण कमी प्रमाणात दिसून आले .मात्र पुढे शहर हद्दीच्या प्रवेशानंतर म्हणजे किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी,थेरगाव, चिंचवडगाव,रहाटणी,काळेवाडी,पिं परी,पिंपळे सौदागर,कासारवाडी,पिंपळे गुरव,सांगवी ह्या २४ की मी परिसरात मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित आहे.अगदी गटाराचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते. शहरातील पिंपरी, सांगवी आणि काळेवाडी परिसरात ती सर्वात जास्त प्रदूषित दिसून आली.
मागील १० वर्षाचा आढावा घेतला असता जुलै ते नोव्हेंबर महिन्यांच्या दरम्यान नदीपात्रातील प्रदूषणाची पातळी पाणी वाहते व मुबलक असल्याने कमी असते. त्यामुळे जलचर प्राण्यांना ऑक्सिजन योग्य प्रमाणात उपलब्ध असतो.परंतु डिसेंबर ते १५ जून दरम्यान नदीच्या प्रदूषनाची पातळी ही वाढलेली आढळते. ह्याच ७ महिन्यांच्या काळात जलपर्णी मोठ्या प्रमाणात फोफावते व त्यामुळे नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते व मोठ्या प्रमाणात मासे मृत पावतात.
सन २००१ मध्ये पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या साधारण १० लाखाच्या आसपास होती.सन २०११ मध्ये ती १८ लाखाच्या आसपास पोहचली.सन २०२१ मध्ये ती २८ लाखाच्या घरात पोहचली. अश्या वाढत्या लोकसंख्येमुळे नदीच्या आसपास असलेल्या उपनगरांमध्ये घरघुती सांडपाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ खाली. महत्वाच्या निरीक्षण बाबी खालीलप्रमाणे
★ मृत मासे पवना नदीत किती वेळा आढळले.
१४ फेब्रुवारी २०१३, ०४ फेब्रुवारी २०१९, २४ मे २०१९, १० जून २०१९, ०९ नोव्हेंबर २०२०,१२ डिसेंबर २०२२ याप्रमाणे १० वर्षात ६ वेळा जलचर मासे मृत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
★ कोठे आढळले मृत मासे.
केजुबाई बंधारा, रावेत बंधारा, पिपरी व सांगवी घाट परिसरात आतापर्यंत मृत मासे निदर्शनास आले आहेत. ★ काय आहेत महत्वाची प्रदूषणाची कारणे
औदयोगिक रासायनिक पदार्थ नदीत मिसळत आहेत, विविध नाल्यांमधून दरोरोज थेट सांडपाणी व मैलापाणी नदीत मिसळत आहे.रासायनिक खते व किटकनाशके मिश्रित पाणी सुद्धा नदीत मिसळत आहे. अश्यामुळे मोठ्या प्रमाणात जलचर व मासे मरुन त्याच पाण्यात त्यांचे शरीर कुजते व पाण्यात मिसळते. देहूरोड कॅन्टोन्मेंट नाला तसेच रावेत भागात ही अनेक नाले नदीला मिळतात.३५ एमएलडी पेक्षा जास्त सांडपाणी नदीत मिसळत आहे. वाल्हेकरवाडी, रावेत,पिंपरी ,सांगवी भागात कचरा थेट नदीत टाकला जात आहे.हिरवे शैवाळ मोठ्या प्रमाणात पाण्यात ऑक्सिजन खेचते त्यामुळे नदी पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. अनेक वर्षांपासून नदीतील गाळ काढला गेला नाही त्यामुळे नदीतील गाळ प्रमाण वाढलेले आहे.दरवर्षी वेगाने जलपर्णी फोफावत असते.पालिका ह्या महत्वाच्या विषयाकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आली आहे.केजुबाई बंधारा परिसरात ८ नाले थेट नदीत मिसळत आहेत.एका नाल्यातून तर दुर्घधीयुक्त रसायनयुक्त पाणी दररोज नदीत मिसळत आहे.
★काय केले पाहिजे ?
नदीच्या घाट परिसरात संरक्षण जाळी उभारून नदी पात्रात नागरिकांना थेट प्रवेश टाळावा.
नदी परिसतात व निळी पूर रेषा भागात झालेले अतिक्रमण हटवावे
उपनगर व नदीपरिसरात सांडपाणी नलिकांचे योग्य असे जाळे उभारणे.
प्रत्येक नाला हा मैला शुद्धीकरण केंद्राशी संलग्न करून फिल्टर पाणीच नदीत सोडले जावे.
करोडो रुपये दरवर्षी वाया घालवण्यापेक्षा केरळ प्रशासनाशी संपर्क करून जलपर्णी काढण्याचे मशीन महापालिकेने मागवून घ्यावे. रसायन सरळ पाण्यात सोडणाऱ्या कंपन्यांना पायबंद घालावा.
शहरातील पर्यावरण अभ्यासक व तज्ज्ञांची समिती बनवून एक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम नदी स्वच्छतेबाबत आखावा.
वरील सर्व निरीक्षण बाबींचा पालिकेने गांभीर्याने अभ्यास करावा.
या पाहणी अहवाल संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले,”सध्या पवना नदीतील पाण्यातील ऑक्सिजन चे प्रमाण २ मि ग्राम/लिटर सुद्धा राहिलेले नाही त्यामुळे मासे मृत पावत आहेत.मोठ्या प्रमाणातील सांडपाणी व मानवी हस्तक्षेप यामुळे शहरातील नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेले दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने सार्वजनिक पर्यावरण मित्रांची व संस्थांची मदत घेऊन पवना बचाव धोरण आखणे गरजेचे आहे.सदर अहवालातील बाबींचा प्रशासनाने अभ्यास करून नदी संवर्धन मोहीम राबविणे आवश्यक ठरते.”