सोशल हँड्स फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा
खडतर परिस्थितीवर मात करून स्वावलंबी बनलेल्या तरुणांची समाज हिताची कामगिरी अभिमानास्पद :डॉ. जितेंद्र होले
पिंपरी: प्रतिकूल परिस्थितीत शिकत उत्तुंग भरारी घेणार्या तरुणांच्या सामाजिक क्षेत्रात 4 वर्षे कार्यरत असलेल्या सोशल हँड्स फाउंडेशन संस्थेचा वर्धापन दिन रविवारी निगडीमध्ये उत्साहात झाला. वर्धापन दिनाच्या या विशेष सोहळ्यामध्ये सोशल हँड्स फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक सदस्यांसह आजी-माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच समाजासाठी अद्वितीय कामगिरी करणाऱ्या संस्थेतील सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सदस्य व देणगीदार यांच्या योगदानातून जमा झालेल्या युवा सहयोग निधीमधून बारामती मध्ये अनाथालय सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला.
बालपणीचा प्रवास अतिशय खडतरपने शिक्षणघेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या व त्यानंतर समाजासाठी वाहून गेल्या चार वर्षापासून अविरत राज्यभर विविध क्षेत्रात समाज कार्य करणाऱ्या सोशल हँड्स फाउंडेशन या आगळ्यावेगळ्या संस्थेचा वर्धापन दिन 13 ऑगस्ट 2023 निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सोशल हॅन्ड फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, युवा वर्ग व कला क्रीडा, क्षेत्रात विविध उपक्रम राबवणारी व आश्रमाचा आधार घेऊन जीवनाची यशस्वी वाटचाल करणाऱ्या तरुणांची नोंदणीकृत संस्था आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जे.एस.पी.एम. संस्थेतील आर.अँड डी. विभागाचे प्रमुख डॉ.जितेंद्र होले, ओवी फाउंडेशनच्या डायरेक्टर सौ.अश्विनी जगताप, ओझर्डे रॅडिकल इंस्टीट्यूटचे संस्थापक प्रा.भूषण ओझर्डे आदी उपस्थित होते. डॉ.जितेंद्र होले यांनी संस्थेच्या कामगिरीचे कौतुक केले. सध्याच्या धकाधकीच्या युगात स्वतःच्या आनंदासोबत दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारी ही पिढी चांगला समाज घडवत आहे हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे डॉ.जितेंद्र होले म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष व सॉफ्टवेअर आर्किटेक मदन दळे यांनी केले. संस्थेने अतिशय दुर्गम भागामध्ये केलेल्या कामाची वस्तुस्थिती पाहून सर्वांचे मन हेलावून गेले. त्यानंतर अश्विनी जगताप यांनी सामाजिक हित जपण्या संदर्भात कवितांव्दारे अतिशय बोलक्या शब्दात महत्व पटवून दिले.
यावेळी संस्थेची वाटचाल व संस्थेला आलेल्या अडीअडचणी व त्यातून मार्ग काढण्यासाठी केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. संस्थेच्या सदस्यांचे तात्कालीन वस्तीगृहाचे अधीक्षक प्रवीण जाधव, औरंगाबाद विभागाचे प्रमुख संदीप सावर्डेकर, संस्थेचे सल्लागार डीव्ही भोसले, आनंद भारती महाराज, फिरोज मिटकरी व दत्तात्रय चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रा. भूषण ओझर्डे यांनी नवीन शिक्षण प्रणाली द्वारे संस्थेच्या सदस्यांना समाज कसा घडवावा याचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.
संस्थेने आजपर्यंत ज्या विषयावर कार्य केले, त्या विषयाशी संबंधीत निवारा, उदरनिर्वाह, बेघर, बालसंसाधन केंद्र, बांधकाम मजूर, लेबर हेल्पलाइन, महिलांचे अधिकार, मूलभूत संसाधन केंद्र, युथ राइट, मुलांचे हक्क अशा विविध विषयांवर सचिन अडागळे यांनी लेखन केलेल्या माहिती पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सचिन अडागळे यांनी केले. आभार प्रदर्शन पुणे विभागाचे प्रमुख दत्तात्रय चव्हाण यांनी केले.