मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. आज राहुल नार्वेकरांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रीया देत म्हटले आहे की, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उध्दव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो.
ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविषयी आपण मिळुन लढू असं देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान केले आहे.
खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे, असं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही घटनाच हे सांगत आहे की, त्यात कशी पद रचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळे पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, ही मान्यता देतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.