‘खासगी क्षेत्रात देखील चांगल्या नोकरीची संधी’
अहमदनगर: प्रतिनिधी
राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू असताना यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींंमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पेपर फोडणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही. वेळीच यावर ठोस कायदा केला नाही तर भविष्यात स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटत राहतील. नोकरभरती करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा. जेणेकरून भविष्यात पेपर फुटणार नाही. यासाठी पेपरफुटी विरोधात कडक कायदा करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी एका मुलाखतीत केली.
विद्यार्थ्यांनी कोणतीही अवास्तव मागणी न करता वास्तव आणि मान्य होणाऱ्या मागण्या केल्या तर मी स्वतः विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहील, असे सत्यजीत तांबे म्हणाले. युवकांनी फक्त सरकारी नोकरी हे अंतिम ध्येय न ठेवता खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधींकडे वळले पाहिजे. सरकारी नोकरीत असलेली शाश्वती, प्रतिष्ठा आणि पैसा या कारणांमुळेच युवक मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीकडे वळलेला आहे. सध्या खासगी नोकरीत देखील चांगला पैसा आणि प्रतिष्ठा आहे. मात्र, युवक त्याकडे दुर्लक्ष करतात, अशी खंत आमदार तांबे यांनी व्यक्त केली.
राज्य सरकार नोकर भरती करताना एखाद्या नामांकित खासगी कंपनीला निविदा देत असते. मात्र, खासगी कंपन्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची भरती करते. या कंपन्यांनी देखील भरती करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि उलट तपासणी करून कर्मचाऱ्यांची भरती करावी. तसेच राज्य सरकारने नोकर भरती करणाऱ्या कंपन्यांना निविदा देण्यापूर्वी एक जरी पेपर फुटला, तर मोठा दंड आकारावा, असे जेणेकरून कोणतीही कंपनी पेपर फोडण्याचे धाडस करणार नाही, असेही भाष्य सत्यजीत तांबेंनी केले.