पुणे-जोधपूर दररोज सुरु करावी तसेच, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण आदी मागण्यांसाठी आईमाता सिरवी (समाज ट्रस्ट) व चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना लेखी निवेदन दिले.
चिंचवड 29 ः पिंपरी चिंचवड शहर जगविख्यात औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या आज 28 लाखाहून अधिक आहे. पुणे शहराची लोकसंख्या अंदाजे 38 लाखाच्या आसपास आहे. त्यापैकी कुमावत, राजस्थानी, गुजराती, चौधरी, अंजना पटेल, प्रजापत, देवासी, घाँसी आदी समाजाची पुणे पिंपरी चिंचवड शहरात 10 लाखांच्या आसपास लोक संख्या असून त्यांना त्यांच्या कुटूंबियांनी भेटण्यासाठी तसेच, व्यवसायासाठी नियमित ये-जा करावी लागते. सध्या पुणे जोधपूर ही रेल्वे सेवा आठवड्यातून एकदाच सुरू असून ती दररोज चालू करावी, यासाठी गेली अनेकवर्षे समाजाच्या वतीने पुणे जिल्हा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष हरिष वर्मा, कुमावत समाजाचे अध्यक्ष भावेष कुमावत, पुनाराम गेहलोत, हिरालाल चौधरी, लालाराम पटेल, हिम्मत घाँसी आदींनी तसेच, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी मनोहर जेठवाणी, मुकेश चुडासमा आदींनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी भेट घेवून लेखी निवेदन दिले.
यावेळी पुणे जिल्हा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष हरिष वर्मा म्हणाले, राजस्थान परिसरात विविध समाजाचे पुणे, पिंपरी चिंचवड शहरात लोक वास्तव्यास आहेत. त्यांना नियमित राजस्थान प्रदेशात त्यांच्या मुळगावी ये-जा करावी लागते. सध्या पुणे-जोधपूर आठवड्यातून एकदाच धावते, ती दररोज सोडण्यात यावी, खाजगी गाड्याने ये-जा करणे परवडत नाही, जर रेल्वे विभागाने लक्ष दिले नाहीतर आंदोलन करण्यात येईल, असे समाज बांधवांना सांगितले.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार म्हणाले,
महाराष्ट्रातील कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, बीड, लातूर, कोकण, मुंबई, सोलापूर आदी भागातील 8 लाखांहून अधिक लोक नोकरी व्यवसायामुळे स्थायिक झाले आहेत. कमी कालावधीत उद्योग व्यवसाय वाढीमुळे दिवसेंदिवस या शहरात प्रचंड लोक नोकरी, व्यवसायाच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात येत आहे. दररोज 150 हून अधिक एक्सप्रेस गाड्या, मालवाहू गाड्यांची ये-जा असते. पुणे येथे किंवा कल्याण, दादर, पनवेल येथे जावून पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा, शारिरीक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आज येत आहे.