
पुणे: प्रतिनिधी
३७व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी पहाटी ३.३० वाजता ४२.१९५ कि.मी.च्या स्त्री-पुरुष मुख्य मॅरेथॉनला फ्लॅगऑफ करण्यात येईल.
कल्पना-विश्व चौक (सणस मैदान) येथून पूर्ण मॅरेथॉननंतर अर्धमॅरेथॉन (पहाटे ४.०० वाजता), १० कि.मी. (सकाळी ६.१५ वाजता), ५ कि.मी. (सकाळी ६.४५ वाजता), व्हीलचेअर (सकाळी ७.२० वाजता) आणि फॅमिली रन (सकाळी ७.३० वाजता) संपन्न होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशी व परदेशी खेळाडूंनी धावण्याचा सराव केला.
याचा बक्षीस वितरण समारंभ सणस मैदान येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न होईल. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण,. आमदार रवींद्र धंगेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे संयोजक व महिला-पुरुष गटातील पहिले तीन विजेते ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. याशिवाय पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. याप्रसंगी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या वाटचालीवर आधारित विशेष अंकदेखील प्रकाशित केला जाणार आहे, अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड यांनी दिली.