
पिं परी – मूळ जमीन मालकाच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला बांधकाम परवानगी देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने अक्षम्य चूक केली असल्याचे निदर्शनास आले आहे. चिंचवड गावातील मंगलमूर्ती गणेश देव व इतरांच्या मालकी हक्काच्या जमिनीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व कर्मचारी अविनाश ज्ञानेश्वर ढमाले व मिलिंद राजाराम ढमाले यांना बांधकाम परवानगी देण्यात आल्यामुळे “मूळ जमीन मालक उपाशी आणि अधिकृत ताबेदार तुपाशी” असा काहीसा प्रकार घडला आहे. यातील अविनाश ढमाले हे महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याने त्यांना या जमिनीची बांधकाम परवानगी बक्षिसि म्हणून देण्यात आली आहे काय असा प्रश्न छावा कामगार युनियनचे अध्यक्ष दिनकर कोतकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
कोतकर यांनी शुक्रवारी पिंपरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जागामालक संजीव सुरेश देव, चंदन शिंगवी, मनीष गोळे, समीर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी कोतकर यांनी सांगितले की, या जागेबाबत अविनाश ढमाले यांनी मा. अपर जिल्हाधिकारी, पुणे यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. संबंधित अपील निकाली निघून ढमाले यांचा दावा फेटाळण्यात आला आहे. अविनाश ज्ञानेश्वर ढमाले यांनी स्वतःहून आपला मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता या दाव्यात झालेल्या युक्तिवाद व साक्षी पुराव्यानुसार अविनाश ढमाले यांचा जमीन मालकीचा दावा फेटळण्यात आला असून सदरची जमीन निर्विवाद आणि निर्दोक पद्धतीने मंगलमूर्ती गणेश देव व इतरांच्या मालकीची असल्याचा स्पष्ट निकाल देण्यात आला आहे. याबाबतची मूळ हकीकत अशी आहे की, देव यांच्या पूर्वजांकडे वाल्हेकर वाडी येथील सर्वे क्रमांक ७७/१, ७७/२, ७७/१/३ +२ब अशी जमीन होती.
त्याचाच एक पोट हिस्सा ७७/३ ही जमीन मंगलमूर्ती गणेश देव व इतर आठ लोकांच्या नावे होती. मात्र त्यापैकी ७७/१,७७/२ या जमिनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांनी अधिग्रहीत केली आहे. त्यामुळे ढमाले कुटुंबीयांची सदर सर्वे नंबर मध्ये काहीही जमीन शिल्लक राहिली नाही. तरीही प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून, दिशाभूल करून अवैध कागदपत्रे दाखल करून अनाधिकाराने सर्वे नंबर ७७/३ च्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे नाव दाखल करून घेतले तसेच मा. अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील ढमाले यांचे अपील फेटाळले असूनही तसेच स्थगिती आदेश असतानाही सदर जागेतील ढमाले यांनी केलेले अतिक्रमण अद्याप प्रशासनाने काढले नाही. यामध्ये प्रशासन ढमाले यांना पाठीशी घालत आहे. अशा बेकायदेशीर कृतीस पाठबळ देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच अविनाश ढमाले यांना हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मनपा सेवेतून निलंबित करावे आणि त्यांच्यावर प्रशासनाची दिशाभूल केल्याबद्दल प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशीही मागणी यावेळी कोतकर यांनी केली. ढमाले यांनी जुनी कागदपत्रे वापरून ७७/३ या मंगलमूर्ती देव व इतर यांच्या मालकी जमिनीवर बांधकाम परवानगी मिळवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या जागेवर अनधिकृत पत्रा शेड व कच्चे बांधकाम करून त्यातून लाखो रुपयांचे अनधिकृत उत्पन्न ते मिळवत आहेत.
मनपा कर्मचाऱ्यांनी असे अनधिकृत बांधकाम करणे हा अपराध आहेच मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने सदर बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून अविनाश ढमाले यांना लाखोंची माया मिळवून देण्यास हातभार लावला आहे. अशा अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या विभागाकडूनच ढमाले यांना अभय देवून प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होत आहे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून महानगरपालिका प्रशासन केवळ नोटीस आणि समज देणे व्यतिरिक्त काही करताना दिसत नाही. संबंधित निकाल आणि आवश्यक ती कागदपत्रे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. मात्र केवळ अविनाश ढमाले हे महापालिका कर्मचारी असल्याने संबंधित विभाग सदर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दिनकर कोतकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचप्रमाणे अविनाश ढमाले व त्यांना पाठीशी घालणारे संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी कोतकर यांनी पत्रकार परिषदेत केली.