नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त शिवसेनेचे तत्कालीन कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दीर्घकालीन घनिष्ठ मैत्री होती. मात्र, अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्या मैत्रीत बिब्बा घातला, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत बोलताना केली.
उद्धव ठाकरे आणि आमची दृढ मैत्री होती. आम्ही दोघांनी सन 2019 ची विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवली. आमच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजप आणि तत्कालीन शिवसेनेने राज्याची धुरा सांभाळावी असा स्पष्ट जनादेश होता. मात्र, शरद पवार यांनी दिशाभूल करून उद्धव ठाकरे यांना आमच्यापासून तोडले, असे शहा यांनी नमूद केले. हा खेळ ज्यांनी सुरू केला त्यांनी तो संपवावा, असेही ते म्हणाले.
भाजप शिवसेनेची युती सुदृढ
उद्धव ठाकरे यांना पुन्हा बरोबर घेणार का, या प्रश्नाला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी अमित शहा यांनी भाजप आणि ‘खऱ्या’ शिवसेनेची युती कायम आहे आणि ती सुदृढ आहे. आमच्या युतीत सर्व काही अलबेल आहे, असे सूचक उत्तर दिले.
सहाव्या फेरी अखेर गाठला 350 चा टप्पा
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या सहाव्या फेरीच्या अखेरीलाच तीनशे ते साडेतीनशे जागांचा टप्पा गाठला आहे. यात मतदानाच्या अखेरच्या फेरीतील जागांचा समावेश नाही. त्यामुळे आम्ही संकल्प केल्याप्रमाणे राष्ट्रीय लोकशाही आघाडी या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावाही अमित शहा यांनी केला.
मोदी पूर्ण करणार पंतप्रधान पदाचा कार्यकाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचांहात्तरी घातल्यानंतर राजकारणातून निवृत्त होणार, हा विरोधकांचा अपप्रचार आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि त्या पुढील काळातही देशाचे नेतृत्व करीत राहतील. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सन 2029 मध्ये देखील मोदी यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल, असेही शहा यांनी स्पष्ट केले.