पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा सुरोस्तव यांच्याशी चर्चा
मुंबई, दि. 14 : महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक राज्यात मोठ्या संख्येने यावेत, यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा सुरोस्तव यांच्याशी चर्चा केली.
आज मंत्रालयातील दालनात रशियाचे महावाणिज्य दूत व त्यांचे शिष्टमंडळ यांनी मंत्री श्री. लोढा यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
उपकौन्सुल जनरल ओलेगा डीरेरा, ओलेगा मेलनीको, मॉस्को पर्यटन समितीचे उपाध्यक्ष अलीना अरतुयुन्वा, मॉस्को आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे बुलेट निरकोवान,तसेच मॉस्को आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे प्रमुख अना फोनाकोव्हा यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन वाढीस चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. पर्यटन क्षेत्रात संयुक्त प्रकल्प राबवून पर्यटन क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.
रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा सुरोस्तव यांनी यावेळी मॉस्को पर्यटन विभागाकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम तसेच पर्यटन सुविधांबाबत सविस्तर सादरीकरण यावेळी केले.