ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शरद पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. “शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण तरीही पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत,” असं सामनाच्या अग्रलेखात (Editorial) लिहिण्यात आलं आहे. शरद पवार यांचं आत्मचित्र लोक माझे सांगाती (Lok Maze Sangati) या आत्मचरित्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दात टीका करण्यात आली आहे. त्याचीच ही परतफेड आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये (BJP) जाण्यासाठी बॅगा भरुनच बसला होता, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्त्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयश ठरले आहेत. भाजपची पोटदुखी अशी की शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा प्लॅन होता. लोक बॅगा भरुन तयारच होते. येणाऱ्यांच्या लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था पूर्ण झाल्याचेही बोलले जात होते. मात्र पवारांच्या खेळीने भाजपचा प्लॅन कचऱ्याच्या टोपलीत गेला.