
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नियमितपणे पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातात. मात्र, पक्षांतर्गत निवडणुकीसंबंधी कागदपत्र आणि पुरावे बंद कपाटातून गायब झाले आहेत, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान केला आहे.
पक्षांमध्ये नियमितपणे अंतर्गत निवडणुका घेतल्या जातात. त्यासंबंधीच्या गोपनीय कागदपत्रांचा सांभाळ करण्याची जबाबदारी दोन जबाबदार व्यक्तींकडे होती. मात्र, ही कागदपत्र आणि पुरावे बंद कपाटातून गायब झाले आहेत. ही सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या दोघांनी पक्ष सोडला आहे. त्यांनी या कागदपत्र आणि पुराव्यांचे काय केले, याबाबत आपल्याला माहिती नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदार अपात्रते संबंधी निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू असून आव्हाड यांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी त्यांची उलट तपासणीही घेतली. आव्हाड यांनी प्रतिज्ञापत्र व्यतिरिक्त इतर काही कागदपत्र आपल्याजवळ बाळगल्याबद्दल अजित पवार गटाच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला.