
भोपाळ: वृत्तसंस्था
सरत्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात यंत्राद्वारे मतदानामुळे काँग्रेसचे पानिपत झाल्याचा दावा राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी केला असला तरीही पराभूत उमेदवारांनी पक्षांतर्गत गटबाजी हे पक्षाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण असल्याचे नमूद करीत पक्षश्रेष्ठींना घरचा आहेर दिला आहे. ही गटबाजी दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वीच आवश्यक पावले उचलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतीय जनता पक्षाला पाणी पाजण्याच्या निर्धाराने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेसला राज्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत २३० जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १६३ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यासाठी आणि पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा उलगडण्यासाठी काँग्रेसच्या वतीने येथील प्रदेश मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत विशेषतः पराभूत झालेल्या उमेदवारांकडून आपल्या पराभवाच्या कारणांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अर्थातच, त्यापैकी बहुतांश जणांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आपल्या वरिष्ठ नेत्यांची री ओढली. मात्र, अनेक उमेदवारांनी पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपला पराभव झाल्याचे अहवालात नमूद केले. आगामी लोकसभा निवडणुकीत या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची आवश्यकताही त्यांनी पक्ष नेतृत्वासमोर व्यक्त केली.