पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी येणार देहूत येणार आहेत. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानच्या विश्वस्तांना घेऊन तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांना देहूमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. ते आमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारले असून १४ जूनला ते देहूमध्ये येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमीपूजन करुन वारकरी संप्रदायाला भव्य-दिव्य भेट दिल्याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळासह दिल्ली येथे तुषार भोसले यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती