पुणे: प्रतिनिधी
ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे – चापेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या शिष्यवर्गाकडून पुण्यात हृद्य सत्काराद्वारे अभिष्टचिंतन करण्यात आले. हा सत्कार सोहळा दि. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, कोथरुड येथे पद्मश्री डॉ.लीला पूनावाला यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमात डॉ. सुचेता भिडे- चापेकर यांच्या शिष्यानी विविध विलोभनीय नृत्यप्रकार सादर केले.डॉ.चैतन्य कुंटे यांनी डॉ .सुचेता भिडे -चापेकर यांची प्रकट मुलाखत घेतली.
डॉ. सतीश आळेकर, पं.सुरेश तळवलकर, शमा भाटे, मनीषा साठे, डॉ. गो. बं. देगलूरकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, मनीषा साबडे, शारंगधर साठे, शुभांगी बहुलिकर, प्रमोद मराठे, रामदास पळसुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गौरी स्वकुळ यांनी सूत्र संचालन केले.कार्यक्रमाच्या संयोजक अरुंधती पटवर्धन, स्मिता महाजन यांनी स्वागत केले.
‘सुचेताताई शतायू व्हाव्यात, आणि त्यांचे नृत्य पाहण्याची संधी आपल्याला मिळावी, अशा सदिच्छा डॉ.लीला पूनावाला यांनी यावेळी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘आताच्या जगात आस्वादक रसिकांची भूमिका महत्वाची आहे. सर्व भावना नृत्यातून व्यक्त करणे अवघड काम असून सुचेताताईंनी ते लीलया केले आहे. त्यांच्या शिष्य वर्गाने ही परंपरा पुढे नेली आहे. हृदयातील भावना नृत्यातून पोचवणे हे मोठी परंपरा असून ती वर्धिष्णू व्हावी. ‘
कलाकार, गुरु ही वाटचाल होताना त्यांची शिक्षणाची पद्धत, नृत्य प्रशिक्षणाची काळानुरूप बदलत गेलेली व्यवस्था, जीवन प्रवास असे अनेक प्रश्न चैतन्य कुंटे यांनी विचारून डॉ सुचेता भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यातून डॉ. सुचेता भिडे चापेकर यांच्या व्यक्तिमत्वाचे, नृत्य प्रवासाचे अनेक पैलू समोर आले.
डॉ.सुचेता भिडे- चापेकर म्हणाल्या, पूर्वी नृत्यात तंत्रावर भर असायचा आणि अभिनयावर भर कमी असायचा. मी नृत्य प्रशिक्षणात नृत्याबरोबर अभिनयावर भर दिला. त्यासाठी ग्रंथांबरोबर भोवतालचा अभ्यास केला. शिष्यांमध्ये कलेबद्दल प्रेम निर्माण करणे हे गुरूचे पहिले काम असते. ते केल्याने नृत्याची गोडी वाढली आणि प्रेक्षक वर्ग देखील वाढला. चित्र, साहित्य अशा सर्व कलांचे नृत्याशी नाते आहे. ते मला गवसले, हे भाग्यच म्हणावे लागेल. नृत्य ही त्रिपेडी वेणी आहे. संगीत, तंत्र , नृत्य जुळून आले पाहिजे. नृत्य हे एक वेळ अभिनयहीन असू शकते, पण भावहीन असू नये, असेच वाटायचे. भाषेचे संस्कार, संगीताचे ज्ञान देखील नृत्य साधनेत उपयोगी पडते .
‘नृत्य प्रवासात साथ, उर्जा देणाऱ्या कुटुंबीयांचे, सर्वांचे मी ऋण व्यक्त करु इच्छिते. नृत्य संस्कार करणारे सर्व गुरु विशेषत पार्वतीकुमार, श्री. किटप्पा यांची मूर्ती हृदयात असते. राजे शहाजी यांच्या रचना करतांना अनेकांनी मला मदत केली’, असेही डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी सांगितले.