
मुंबई: प्रतिनिधी
आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत पुरेशी नसून ती वाढवून मिळावी या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विनंतीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली आहे. अध्यक्ष हे दीड वर्षाच्या कालावधी केवळ डमरू वाजविण्याचे काम करीत आहेत, असे राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
शिवसेना आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय देण्यास वेळ काढूपणा केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे याप्रकरणी निर्णय घेण्यास न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत घालून दिली आहे. मात्र, या मुदतीत निर्णय देणे शक्य नसल्याने न्यायालयाने वेळ वाढवून द्यावी, अशी विनंती अध्यक्षांनी केली आहे. याबाबत राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. नार्वेकर हे दीड वर्ष केवळ डमरू वाजवीत बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
नार्वेकर यांचे कामकाज केवळ दिल्लीच्या आदेशावर चालते असा आरोप करून राऊत म्हणाले की, कोणतीही विचारधारा नसलेल्या आणि वारंवार पक्ष बदलणाऱ्या नार्वेकर यांच्याकडून आम्ही नैतिकता आणि शिस्तीचे धडे शिकावे काय? नार्वेकर यांनी आतापर्यंत पाच वेळा पक्ष बदलले असून ते ज्या पक्षात गेले नाहीत, असा एकही पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात नसावा, अशी कोपरखळी ही राऊत यांनी मारली.
महाराज सुरत लुटायला गेले आणि तुम्ही चाटायला
शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. आमदार अपात्रतेच्या सुनावणी दरम्यान, आपण सुरतेला का गेला होतात, असा प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी गोगावले यांना विचारला. त्याला उत्तर देताना गोगावले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. म्हणून आम्हीही सुरत पहायला गेलो. त्यांच्या या उत्तरावर, शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले आणि तुम्ही चाटायला, अशी कडवट टीका राऊत यांनी केली.