पुणे : प्रतिनिधी
जीवनाचे सम्यक दर्शन आजोबा आपल्या नातीला काव्यातून घडवित आहेत तर मोठी होणारी नात आजोबांना दु:खाची कहाणी विसरायला सांगत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात भवताली अंधार दाटून येताना नात आपल्या आजोबांना आश्वासक बोल ऐकविते येथे जीवनाचे वर्तुळ पूर्ण होताना दिसते आहे, असे भावोद्गार ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांनी काढलेत.
संस्कृती प्रकाशन, आडकर फौंडेशन आणि बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध कवी उद्धव कानडे लिखित ‘बोल विभा बोल’ या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन वझे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अशोक विद्यालय सभागृहात आयोजित कार्यक्रमास संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिताराजे पवार, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, अशोक विद्यालयाचे संचालक प्रथमेश आबनावे, मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, सुलक्षणा शिलवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर होते. या प्रसंगी विद्या विकास वसतिगृह, अशोक विद्यालयास बाबा भारती ज्ञानसाधना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वझे म्हणाले, आजोबांचा नातीशी असलेला काव्यरूपातील हृद्य संवाद या काव्यसंग्रहातून उलगडताना दिसून येत आहे. कवी आपले शाब्दीक कौशल्य दाखविण्यापेक्षा आपले हृदय नातीजवळ उलगडून दाखवित आहे. नातीच्या नजरेत अवकाश असावे हा ध्यास तिच्या मनात कवी रुजवत आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सचिन ईटकर म्हणाले, मोठ्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचल्यानंतर आपल्याला आयुष्यात पुढे काय बनायचे आहे याची स्वप्ने विद्यार्थ्यांनी जरूर पहावीत. या पुस्तकातील कवितांमधून मुलांना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चांगले भाषण-कविता ऐकणे, मोठी व्यक्ती भेटणे यातून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडते. विद्यार्थी काय ऐकतात, पाहतात, कोणते आदर्श पाळतात त्यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे.
पुस्तकाविषयी बोलताना उद्धव कानडे म्हणाले, विद्यार्थ्यांसमोर पुस्तकाचे प्रकाशन होत आहे या विषयी मला अधिक आनंद आहे.
ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, या पुस्तकातील कवितांमधून आजोबा आणि नातीमधील नात्यांचे गहिवरलेले क्षण अनुभवता येत आहेत.
प्रास्ताविकात सुनिताराजे पवार म्हणाल्या, मोबाईलच्या युगात आता बालकांच्या हाती पुस्तक देणे आवश्यक आहे. पुस्तकांमधून उत्तम साहित्यकृती, संस्कारक्षम कथा-कविता, सकस आणि शाश्वत लेखन मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
प्रथमेश आबनावे म्हणाले, एक प्रकारचे समाजकर्तव्य या पुस्तकाद्वारे पहायला मिळत आहे. उपस्थितांचे स्वागत ॲड. प्रमोद आडकर, सुनिताराजे पवार, महेंद्र भारती यांनी केले. विद्या विकास वसतीगृह अशोक विद्यालयास मिळालेला बाबा भारती ज्ञानसाधना पुरस्कार गौरव आबनावे आणि मुख्याध्यापिका विद्या कांबळे यांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले. तर आभार महेंद्र भारती यांनी मानले.