पिंपरी: प्रतिनिधी
ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् सर्व कलाकारांच्या उपस्थित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी आज निघाली. नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती.
ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी -चिंचवडकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. यावेळी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. नाटक किंवा सिनेमात दिसणारे कलाकार नाट्य दिंडीत दिसल्याने नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तसेच अनेकांनी हे सर्व क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.
मोरया गोसावी मंदिरा पासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोचली. नाट्य दिंडीचे स्वागत लोकांनी खूप उत्साहात केले. नाट्य दिंडीच्या सुरूवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.
पिंपरी – चिंचवडकरांची सकाळ ढोल, ताशा अंन लेझीम अन् जयघोषाच्या आवाजाने झाली. त्यात सकाळच्या वेळी वासुदेव, पिंगळा, गोंधळी, वाघ्या – मुरळी यांच्या सादरीकरणाने नागरिक भारावून गेले होते. ही दिमाखदार नाट्य दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. ठिकठिकाणी थांबून नागरिकांनी या नाट्य दिंडीचा नयनरम्य सोहळा अनुभवला. नाट्य दिंडी आपल्या दारी असा काहीसा अनुभव या रसिकांनी यावेळी अनुभवला.
नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, निर्मिती सावंत,अमृता सुभाष, प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पृहा जोशी, कांचन अधिकारी, शुभांगी गोखले, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच अभिनेता सुशांत शेलार, भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले.