महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना सवाल
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर कडवट टीका केली आहे. तुमच्या नवनिर्माण सेनेचा नमो निर्माण पक्ष कसा झाला, असा सवाल राऊत यांनी राज ठाकरे यांना केला आहे.
भाजपाचे निवडणूक रणनीती कार आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना एकेकाळी राज्यात पाऊल ठेवू देऊ नका, असे म्हणणारे राज ठाकरे यांनी त्याच पक्षाला पाठिंबा कसा दिला? भाजपने राज ठाकरे यांना अशी कोणती फाईल दाखवली की ज्यामुळे त्यांना तातडीने पाठिंबा जाहीर करावा लागला, असे सवालही राऊत यांनी केले आहेत.
ठाकरे हे असे नाव आहे की ज्यांना कोणी झुकू शकत नाही. मग राज ठाकरे यांनी शरणागती पत्करली त्यासाठी त्यांना धमक्या देण्यात आल्या असाव्यात असे आपल्याला वाटते. अशा धमक्या आम्हालाही दिल्या गेल्या. मात्र, आम्ही त्याला भीक घातली नाही. आम्ही त्यांच्याशी लढत आहोत. लढत राहणार आहे. उभ्या महाराष्ट्राने त्यांच्याशी लढणे आवश्यक आहे, असेही राऊत म्हणाले.
स्वार्थासाठी कधीही भाजपबरोबर गेलो नाही
शिवसेना ठाकरे गटावर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपाशी युती आणि विरोध याबाबत आरोप केले. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपबरोबर गेलो नाही. भाजपाने आपले खरे दात दाखवायला सुरुवात केल्यानंतर तोडून आम्ही बाहेर पडलो. आता आम्ही त्यांच्याशी लढतो आहोत. महाराष्ट्र बाबत आपल्या पक्षाची भूमिका सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांची कधीही तडजोड केली जाणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले.