
मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांना मालमत्ता गैरव्यववहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. सतत ७ तास चौकशी केल्यानंतर मलिक याना अटक करण्यात आली. या कारवाईचा दाऊदशी संबंधित मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.
बुधवारी सकाळीच सक्तवसुली संचालनालयाचे पथक नबाब मलिक यांच्या निवासस्थानी रवाना झाले त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात आणण्यात आले. सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. मलिक यांच्या अटकेची माहिती मिळताच सक्तवसुली संचालनालयाच्या जवळच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली. त्या ठिकाणी मलिकी यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात आला. या कारवाईनंतर सक्तवसुली कार्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
मलिक यांनी काही दिवसापूर्वी आपल्यावरील कारवाईची शक्यता सूचित केली होती. ईडी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करते, असा आरोप त्यांनी केला होता. ईडीचे काम कशा पद्धतीने चालते हे आम्हालाही माहित आहे. योग्य वेळ आली की आम्हीही माहिती उघड करू; असा इशारा त्यांनी दिला होता.
या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दाऊद कनेक्शन’ उघडकीला येईल आणि अनेक जण गोत्यात येतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे तर ठाकरे सरकारमधील सगळ्याच घोटाळेबाजांना जाब द्यावाच लागेल; अशी प्रतिक्रिया किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या कारवाईचा निषेध केला. भाजपाला मलिक यांनी उपस्थित केले सवाल न रुचल्यानेच ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत इतके सुडाचे राजकारण कधीही झालेले नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.