मुंबई : प्रतिनिधी
हिंदू धर्मियांच्या मतांचं ध्रुवीकरण करून आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी पक्षाचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यासाठी पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून देशांमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली आहे . असे प्रकार टाळण्यासाठी या देवस्थानांना सैन्याच्या ताब्यात द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
वाराणसीचं ज्ञानवापी मशीद, अयोध्या राम जन्मभूमी मंदिर, मथुरा शाही इदगाह, जम्मू कटरा येथील वैष्णोदेवी मंदिर, दिल्लीमधील स्वामीनारायण, अक्षरधाम मंदिर हे कदाचित लक्ष्य होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष-आरएसएस यांची धार्मिक ध्रुवीकरण करायची वृत्ती आहे. तिला वाव मिळू नये, म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करत आहे. निवडणुका होईपर्यंत ही सगळी मंदिरं सैन्याच्या ताब्यामध्ये देण्यात यावीत. निवडणुकीनंतर मग त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या ताब्यामध्ये ती जातील. निवडणूक धार्मिक स्वरूपाची होऊ नये हाच आमचा हेतू आहे, असे ते म्हणाले.
दंगल घडवण्याचा, दहशत माजवण्याचा प्रयत्न
गेल्या नऊ वर्षा मधील राजकारण बघता एखाद्या समाजावर अत्याचार करायचा. त्याच्यातून दहशत निर्माण होईल असा प्रयत्न करायचा, अशी परिस्थिती आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये औरंगजेबाच्या नावाचा वाद काढण्याच्या प्रयत्न या ठिकाणी झाला. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळं तो वाद त्या ठिकाणी थांबला. आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशांमध्ये अशांतता कशी राहील, याचा प्रयत्न सुरू असतो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. अशा या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे आलेल्या माहितीवरून हिंदू धर्मीयांच्या जिव्हाळ्याच्या मंदिरांवर हल्ला केला जाणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.
महत्त्वाचे विधेयक नाही
लोकसभेचं विशेष अधिवेशन ज्यावेळेस जाहीर झाले, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं आम्ही भूमिका मांडली की, हे फोटोसेशन आहे. जो काही अजेंडा काल बाहेर आला त्यावरून असे दिसते की, कुठेही महत्त्वाचे विधेयक नाही. राज्यसभेनं मंजूर केलेले विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करायचे, हा एवढाच फक्त अजेंडा आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
इंडिया आघाडीलासुद्धा विनंती करणार
ही पाच मंदिरे निवडणूक होईपर्यंत सैन्याच्या ताब्यात द्यावी, ही भूमिका इंडिया आघाडीने सुद्धा घ्यावी. तसा त्यांच्याकडे आग्रह धरत आहोत, या संदर्भात लवकरच आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहारही करणार आहोत, असं आंबेडकर म्हणाले. तर या हल्ल्याची माहिती शासनाच्या गुप्तहेर खात्यांकडेसुद्धा आलेली आहे. म्हणून ही दक्षता घेतली पाहिजे, यासाठी वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.