पिंपरी, पुणे (दि. ४ जुलै २०२३) : धर्मवीर संभाजी अर्बन को ऑप बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव शितोळे तर उपाध्यक्षपदी ॲड. आनंद थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार खात्याचे उपनिबंधक डॉ. शितल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
जून महिन्यात धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची सन २०२३ ते २०२८ साठी पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत बँकेचे संस्थापक बाबुराव शितोळे तसेच तत्कालीन अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ यांचे धर्मवीर संभाजी सहकार पॅनेलचे १३ उमेदवार बहुमताने विजयी झाले. विरोधी पॅनेलला १५ पैकी २ जागा मिळाल्या. विजयी उमेदवारांपैकी धर्मवीर संभाजी सहकारी पॅनेलचे बाबुराव विठ्ठलराव शितोळे, ॲड. आनंद गोरख थोरात, गोरखनाथ गेनबा झोळ, गोकुळ जर्नादन शितोळे, सुभाष बापुराव शिंदे, उत्तम किसन चौधरी, ॲड. सुभाष सावन माछेरे, राहुल बाळु जाधव, अनंता चंद्रकांत चव्हाण, सचिन सुनिल चौधरी, ज्ञानेश्वर मारूती गायकवाड, शैलजा बाबुराव शितोळे, ज्योती अंकुश कापसे तर विरोधी पॅनेलचे राकेश रामदास पठारे व दिलीप साहेबराव तनपुरे हे उमेदवार विजयी झाले.
नवनिर्वाचित संचालक मंडळाची जून महिन्यात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक (सहकार) डॉ. शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदी बाबुराव विठ्ठलराव शितोळे यांची आणि उपाध्यक्षपदी ॲड. आनंद गोरख थोरात यांची बिनविरोध निवड झाली.
धर्मवीर संभाजी अर्बन को ऑप बँकेच्या राज्यात एकूण १० शाखा कार्यरत असून बॅंकेचे स्वमालकीचे मुख्य कार्यालय फुगेवाडी येथे मुंबई – पुणे महामार्ग लगत आहे. बँकेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा व लगतचे अहमदनगर, सोलापुर, सातारा, रायगड व ठाणे जिल्हा असे आहे. बँकेचे भागधारक १० हजार पेक्षा जास्त आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष बाबुराव शितोळे यांनी बँक प्रगतीपथावर नेण्याकरीता बँकेच्या व्यवसायात भरीव वाढ, ठेव संकलन, कर्ज वाटप, थकीत कर्ज वसुली, नवीन सुधारीत वेतन करार, बँकेच्या सर्व सेवा अद्ययावत करणे विशेष करून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे. नवनियुक्त संचालक व सर्व कर्मचारी यांना एकत्र घेऊन बँकेच्या विकासासाठी काम करू असे सांगितले. माजी अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ यांनी आभार मानले.