पुणे: प्रतिनिधी
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘महात्मा गांधी आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत’ या विषयावरील लेखक, समाजशास्त्र अभ्यासक शमसुल इस्लाम यांच्या व्याख्यानाला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ कुमार सप्तर्षी अध्यक्ष स्थानी होते. प्रशांत कोठडीया, डॉ. शशिकला रॉय, संदीप बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.म
यावेळी इस्लाम म्हणाले, ‘पाकिस्तान ज्याप्रमाणे धर्माच्या आधारे इस्लाम राष्ट्र झाले, त्यानुसार भारत हिंदू राष्ट्र होण्यास महात्मा गांधींनी विरोध केला. त्यामुळेच त्यांची हत्या झाली.
शमसूल इस्लाम पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांचा द्विराष्ट्रवादाला आणि धार्मिक तसेच जातीयवादाला प्रथमपासूनच विरोध होता. त्यामुळेच त्यांची पाच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी हत्या करण्याचे कट करण्यात आले. त्याचप्रकारे अलिकडच्या काळातही ज्यांनी धार्मिक वादाला आणि जातीयवादाला विरोध केला त्या गौरी लंकेश, दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांचीही हत्या झाली. त्यामुळे ४० कोटी वा ५५ कोटी पाकिस्तानला दिल्याने गांधींची हत्या केली ही सरळ सरळ एक पुढे केलेली ढोंगी सबब होती.”
“महात्मा गांधींची लोकसहभागातून मोठी आंदोलने उभारण्याच्या दृष्टीला आणि हातोटीला शह देण्यासाठीच सत्ताधारी इंग्रजांनी मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेला हाताशी धरून द्विराष्ट्रवाद म्हणजेच देशात फूट पाडली, या द्विराष्ट्रवादाच्या मोहाला मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे धर्माच्या मोहापायीच बळी पडले आणि त्यातून, ज्यांना दोन राष्ट्र, दोन देश नको होती, फाळणी नको होती, त्यांना ती जबरदस्तीने स्वीकारावी लागली, असेही स्पष्टपणे दिसून येते, असेही मत शमसूल इस्लाम यांनी मांडले.