
मुख्यमंत्री दौरा अर्धवट सोडून नागपूरहून परत मुंबईकडे
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभा करून संपूर्ण पक्षावरच आपला दावा सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही आज शक्तिप्रदर्शन करत आहेत.
पक्षावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे तर अजित पवार यांनी वांद्र्याच्या एका शिक्षण संस्थेत आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे अजित पवार स्वतः सर्वांशी संपर्क साधून आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत काही काळापूर्वी दुरुस्ती करून सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांकडे बहाल करण्यात आले होते. या घटना दुरुस्तीची सविस्तर माहिती शरद पवार त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत देणार आहेत. या घटनादुरुस्तीनुसार प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेता आणि प्रतोद यांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षांकडे आहेत. त्यामुळे कार्याध्यक्ष पदाचा अधिकार वापरून प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या नियुक्ती घटनाबाह्य आहेत असा शरद पवार यांचा दावा आहे. मात्र, संपूर्ण पक्ष आपल्या पाठीशी असल्यामुळे शरद पवार यांना तूर्तास कोणतेही मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा दावा अजित पवार करीत आहेत.
पक्षातील किमान ३५ आमदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. सध्या अजित पवार यांच्या पाठीशी असलेल्या आमदारांची संख्या २५ ते २७ असल्याचे दिसून येते तर पवार यांच्याबरोबर पंधरा ते सतरा आमदार असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या तीन खासदारांपैकी एकटे प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या बाजूने तर सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या बाजूला आहेत. शरद पवार यांच्या प्रभावामुळे संभ्रमात असलेले किंवा कुंपणावर असलेले काही आमदार त्यांच्या बाजूला जातील अशीही अपेक्षा आहे. त्यामुळे आजचे शक्तिप्रदर्शन दोन्ही गटांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने शिंदे गटाचा सत्तेतील वाटा कमी झाला आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षित असलेले मंत्रीपद दूर जाताना दिसून येत आहे. अर्थातच, शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघड होऊ लागली आहे. कदाचित त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांना नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे परतावे लागले आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू या नागपूरच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला रवाना झाले होते.