आळंदी येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे पूजन आणि महाआरती
पुणे: प्रतिनिधी
रामाची दीपावली सर्व घरांमध्ये साजरी झाली आहे. यातून लोकांची भक्ती, श्रद्धा आणि आस्था दिसत आहे. जगातील, भारतातील ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा विनाश व्हावा आणि देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावी अशी प्रार्थना विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली. तसेच सदाचारकडे, चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी या उत्सवामधून शक्ती मिळावी अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात, प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होत असतानाच देशभरात देखील या सोहळ्याचा उत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आळंदी येथील श्री साईबाबा मंदिरात, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते भगवान श्री रामांच्या मूर्तीचे पूजन, महाआरती व होमहवन करण्यात आला. याप्रसंगी, श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट, वडमुखवाडी विश्वस्त आणि अध्यक्ष सुभाष नेलगे, शिवकुमार नेलगे, मंदिराचे पुजारी अमोल पाठक व महेश मोकाशी, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, पोलीस सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांसह मंदिर समिती सदस्य आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.