मुंबई : दुचाकीवरून जगभ्रमंती मोहिमेवर जाणाऱ्या रमिला रामकिसन लटपटे यांना मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज शुभेच्छा दिल्या. ‘एक मराठमोळी तरूणी जगभ्रमंतीचे साहस करणार आहे, तिची ही जिद्द आणि चिकाटी अनेकांसाठी प्रोत्साहन ठरेल’ अशा शब्दांत त्यांचे कौतुकही केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी श्रीमती रमिला यांनी भेट घेऊन, मुख्यमंत्र्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली. रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात. त्यांनी रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार त्या ९ मार्च २०२३ पासून त्यांच्या गेट-वे-ऑफ इंडियापासून त्यांच्या भ्रमंतीला प्रारंभ होणार आहे. सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास त्या मोटरसायकलवरून पारंपारिक वेशभुषेत करणार आहेत. या प्रवासात जगभरातील चाळीस देशांना भेट देतील.
रमिला लटपटे यांच्या या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व त्यांच्या या मोहिमेसाठी निधी संकलनातही योगदान दिले. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.