
पुणे: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथमच सभागी होऊन तृप्ती दिलीप चोरडीया या दिव्यांग जलतरणपटूने दोन सुवर्ण पदकांसह तब्बल ३ पदके पटकावण्याची कामगिरी केली आहे.
उदयपूर (राजस्थान) येथे २५ ते २७ मार्च २०२२ दरम्यान पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रीय ‘पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप २०२१-२२’ मध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून तृप्ती सहभागी झाली. प्रथमच राष्ट्रीय स्पर्धे मध्ये भाग घेतला असूनही तिने १०० मीटर (फ्री स्टाईल) सुवर्ण पदक, १०० मीटर (ब्रेस्ट स्ट्रोक) सुवर्ण पदक आणि १०० मीटर (बॅक स्ट्रोक) कांस्य पदक अशी तीन पदके जिंकून चमकदार कामगिरी केली.
प्ती जन्मतः पाठीच्या मणक्यावर गाठ असल्यामूळे कमरेपासून खालचे शरीर पूर्णपणे कमजोर आणि निर्जीव आहे (९० टक्के अपंगत्व) तरीही तिने वयाच्या चौथ्या वर्षांपासून दररोज जलतरणाचे प्रशिक्षण घेतले असून तिचा नियमित सरावही सुरू ठेवला आहे.
घोरपडी पेठ येथील निळू फुले जलतरण तलावात मार्गदर्शक हर्षद इनामदार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तृप्तीचा सराव सुरू आहे. या वाटचालीमध्ये संपूर्ण कुटुंबाची व मित्रपरिवाराची सर्व प्रकारे साथ मिळते. तसेच ती जलतरणाबरोबरच व्हीलचेअर बास्केटबॉल सुद्धा खेळते. भविष्यात पॅराऑलिम्पिक जलतरण आणि बास्केटबॉल या दोन्ही खेळांमध्ये यश संपादन करण्याचे तिचे ध्येय आहे.