नवी दिल्ली: प्रतिनिधी
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विश्व प्रयोग झाल्याची चर्चा असून त्याला कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्व प्रयोगाच्या प्रकाराबाबत साशंकता असली तरीही दाऊदला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे, या माहितीची पुष्टी डी कंपनी मधील सूत्र करीत आहेत. दाऊद वरील विष प्रयोगाची बातमी प्रसिद्ध होताच पाकिस्तान मधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
मूळचा मुंबईकर गुंड असलेला दाऊद इब्राहिम जगभरात आपले हात पाय पसरून जगभरातील तपास यंत्रणांच्या तोंडाला पाने पुसत पाकिस्तानात स्थायिक झाला आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा यांच्या निगराणीखाली तो पाकिस्तानत राहत असल्याचे बोलले जाते.
दोन दिवसांपूर्वी अज्ञात इसमाने त्याच्यावर विष प्रयोग केल्याची बातमी समाज माध्यमातून चवीने चर्चिली गेली. मात्र, कोणत्याही अधिकृत यंत्रणेने अथवा दाऊदचे कुटुंबीय किंवा साथीदार यापैकी कोणीही याबाबत भाष्य केलेले नाही. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे मात्र सांगितले जात आहे. काही काळापूर्वी गँगरीन झाल्याने त्याची दोन बोटे कापल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
प्रकृती अस्वस्थ त्यामुळे दाऊदला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्या रुग्णालयात पाक संरक्षण यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाऊदला ठेवण्यात आले आहे त्या मजल्यावर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आणि दाऊदचे कुटुंबीय यांच्याशिवाय इतरांना जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही वृत्त आहे. मुंबई पोलीस दाऊदच्या मुंबईतील नातेवाईकांकडून या वृत्ताची सत्यता पडताळून पाहत आहेत.