- गणेशभक्तीच्या अनुभवाने मुख्यमंत्रीही भारावले
पुणे: प्रतिनिधी
काश्मिरमधला लालचौक हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. रक्तरंजित, दहशतीच्या छायेखाली असलेला परिसर अशी या चौकाची ओळख आहे. या चौकातल्या पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो आहे. लाल चौकातल्या बसविलेल्या गणपतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले आणि काश्मिरमधल्या नागरिकांनी जपलेल्या या परंपरेचे कौतुक तर केलेच शिवाय संवेदनशील परिस्थिती गणेशोत्सवानिमित्त अधोरेखित होणाऱ्या काश्मिरच्या सामाजिक व धार्मिक एकोप्याने आणि एकोप्याने ते भारावूनही गेले. पुण्यातील ‘सरहद’ संस्थेच्या पुढाकाराने हा योग जुळवून आणला गेला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, वैभव वाघ, सचिन जामगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘काश्मीरच्या लाल चौकात गणेशोत्सव साजरा होणं ही महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी घटना आहे. काश्मिरमध्ये १०० हून अधिक मराठी कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामुळं काश्मिरमधल्या इतर ठिकाणीही गणेशोत्सव साजरा केला जातो. पण लालचौकाला हिंदूविरोधी किंवा भारतविरोधी भावनांचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळंच इथल्या गणेशोत्सवाला एक वेगळं महत्त्व आहे. विशेष म्हणजे इथल्या गणेशोत्सवात मराठी कुटुंबीयांसोबतच काश्मिरी मुस्लीम, काश्मिरी पंडित, शीख, बंगाली हेही तितक्याच उत्साहानं सहभागी होतात. पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून सुरू असलेल्या या गणेशोत्सवाने मी भारावून गेलो आहे. हा एकोपा, सलोखा आणि शांती काश्मिरसह संपूर्ण भारतात अखंड टिकून राहावी, हाच आशीर्वाद मी गणपतीबाप्पाकडे मागितला आहे.’
नहार म्हणाले, ‘गणेशाचं नातं काश्मिरशीही आहे. गणपती हा पार्वतीचा पुत्र आणि अनेक पुराणकथांमध्ये काश्मिरला पार्वती म्हटलं आहे. त्यामुळंच काश्मिरमध्ये गणेशभक्तीचं आगळंवेगळं रूप पाहायला मिळतं. या उत्सवामुळं एकोप्याचा विचार अधोरेखित होतो आहे. हा एकोप्याचा विचार महाराष्ट्रात रुजला संतपरंपरेमुळं. विशेष म्हणजे आपल्या संतपरंपरेवर काश्मिरमधल्या शैवपरंपरेचा मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्राचं काश्मिरशी असंही नातं आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव काश्मिरमध्ये लाल चौकात साजरा होत आहे, यातून महाराष्ट्राचं काश्मिरशी असणारं नातं अधिक बळकट होईल.’
गणपतीबाप्पा विघ्न दूर करून सुख आणि शांती देतो. काश्मिरमध्ये गणपतीबाप्पाचं आगमन हे आनंद देणारं आणि चेतना निर्माण करणारं आहे. या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सहभागी होणारे एकनाथ शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, या उत्सवात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सहभागी होणं ही गोष्ट महाराष्ट्राच्या परंपरेला अधोरेखित करणारी आहे. खरंतर इस्लाममध्ये मूर्तिपूजा वर्ज्य आहे, पण तरीही मुस्लिम बांधव मराठी बांधवांच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होतात, ही विशेष गोष्ट आहे, अशी भावना सचिन जामगे आणि वैभव वाघ यांनी यावेळी व्यक्त केली.
काश्मिरमधल्या लाल चौकातल्या गणेशोत्सवाने यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या २४ वर्षांपासून पंचमुखी हनुमान मंदिरात गणपती बसविला जातो. त्याआधी दहा वर्ष एका मराठी घरात ही मूर्ती बसवली जात होती. पण गेल्या २४ वर्षांपासून पंचमुखी हनुमान मंदिरातल्या या उत्सवाला सार्वजनिक रूप प्राप्त झाल्याचं बघायला मिळत आहे. या गणेशमूर्तीचं अनंत चतुर्दशीला झेलम नदीत विसर्जन केलं जातं, अशी माहिती सरहद संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.