धनंजय मुंडे यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल
पुरंदर : प्रतिनिधी
शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केले ते त्यांचे संस्कार आणि अजितदादा भारतीय जनता पक्षाबरोबर गेले ती गद्दारी, असेच आश्चर्य उडत राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
पुरंदर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते. सुनेत्रा पवार या सन 1985 मध्ये लग्न होऊन धाराशिव मधून बारामती ला आल्या आणि तेव्हापासूनच बारामतीच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली, असा दावाही मुंडे यांनी केला.
शरद पवार आजही आपल्यासाठी आदरणीय आहेत. ते जाणते राजे आहेत. सगळी रयत हे जाणत्या राजाचे कुटुंब असते, अशी कोपरखळी मारत सुनेत्रा पवार यांना बाहेरची म्हणणाऱ्या शरद पवार यांना टोला लगावला. आपण घरात येणाऱ्या सुनेला लेकच मानतो. मात्र या लोकसभा निवडणुकीत या संस्काराचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे, असेही मुंडे म्हणाले.
सन 2017 मध्ये कुठे, कशी बैठक झाली, दिल्लीत कोणाच्या घरी शिवसेनेला भाजपापासून दूर करण्यासाठी कूटनीती आखण्यात आली, याचे चित्रीकरणही आपण सादर करू शकतो, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. आम्ही शिवसेनेला भाजपपासून दूर केले. ती आमची चाल होती, असे शरद पवार सांगतात आणि त्यावर उद्धव ठाकरे हसतात. किती ही हतबलता, असा टोलाही मुंडे यांनी लगावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 53 आमदारांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता. अजित दादा तो कागद दाखवतील की नाही ते माहिती नाही. मी मात्र केव्हा तरी तो कागद उघडकीला आणणार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.