नितिन येलमार(पिंपरी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी प्रत्यक्ष ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब्रीड कॉन्फिगरेशन सिस्टमद्वारे प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळणे शक्य होणार आहे. तसेच खलोलशास्त्रातील शिक्षक व विद्यार्थी यांना खगोलशास्त्राची सर्व माहिती या तारांगण प्रणालीच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे. तारांगण प्रणालीचा हा प्रकल्प पुणे जिल्ह्यामधील पहिलाच प्रकल्प आहे.
खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अनेकांना आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे. अनेकजण खगोलशास्त्राचा अभ्यास करू लागले आहेत. शहरातील विद्यार्थी, नागरिकांना खगोलशास्त्राची इत्भूंत माहिती मिळावी, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे चिंचवड येथील सायन्स पार्कच्या बाजूलाच तारांगण प्रकल्प उभारला आहे.
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, तारांगण सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर यांनी चित्रफितीव्दारे संदेश देत असताना म्हणाले, आतापर्यंत अनेक शहरामध्ये तारांगण तयार झालीत. परंतू पुणे परिसरामध्ये तारांगण नाही हे जाणवत होते. ती माझी इच्छा माझी पूर्ण होत आहे त्यामुळे मला आनंद होत आहे. तारांगणामुळे आपल्याला किश्वाची जास्त माहिती होतेच शिवाय वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय ? याची अधिक चांगली माहिती मिळते.
यावेळी तारांगण प्रकल्प संचालक प्रवीण तुपे यांनी तारांगण प्रकल्पाविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांगण प्रकल्पाची पाहणी केली. तारांगणात खगोलशास्त्राची चित्रफीत पाहिल्यानंतर तारांगणाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या सूर्यमालिकेची चांगल्याप्रकारे माहिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘दिवसा तारे पहाणे’ ही बोलण्यातील कल्पना तारांगणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली. तासभर तारांगणात बसून सृष्टीची रचना समजून घ्यावी असे वाटले. आपली मुले आणि युवकांच्या ज्ञानात सकारात्मक भर घालण्याचे आणि विज्ञानाकडे आकर्षित करण्याचे काम तारांगणाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री महेश लांडगे, उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
तारांगण प्रकल्पात 15 मीटर व्यासाचा एक अर्धगोलाकृती डोम (ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल) उभारण्यात आला आहे. या डोमच्या माध्यमातून आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी प्रत्यक्ष पाहता येणार असून आकाश दर्शन करत असल्याचा नागरिकांना अनुभव येणार आहे. एकाचवेळी 120 नागरिक हे डोम पाहू शकतात. याठिकाणी दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी एक 180 आसन क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे.