मुंबई: सत्ताधाऱ्यांच्या राजकीय लाभासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आणि अवैध कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच नव्हे तर मंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आणि सध्याच्या काळात होत असलेला तपास यंत्रणांचा गैरवापर लक्षात घेता पुढील काळात अनेकांवर ती पाळी येणार आहे; असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
राऊत यांच्या कन्या उर्वशी आणि विदिता यांचे वाईन निर्मिती उद्योगातील भागीदार सुजित पाटकर यांच्या आस्थापनांवर सक्तवसुली संचालनालयाने छापे घातले आहेत. हे छापे राजकीय असूयेपोटी घातले गेल्याचा दावा करतानाच राऊत यांनी, खोट्या कारवाया करणारे अधिकारी आणि मंत्र्यांना देखील तुरुंगाची हवा खावी लागली असल्याची जाणीव करून दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, पाटकर यांच्याबाबत ‘ईडी’चा तपास सन २०२४ पर्यंत असाच सुरू राहणार असून त्यांची त्यासाठी पूर्ण तयारी आहे. आम्ही असल्या छाप्यांना घाबरत नाही. पाटकर यांना आधी भारतीय जनता पक्षात येण्याची ‘ऑफर’ देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारल्याने त्यांना धमकावण्यात आले. आता केंद्रीय तपास यंत्रणांना त्यांच्या मागे लावले आहे, असे आरोप राऊत यांनी केले.
संजय राऊत यांच्या मुली उर्वशी आणि विदिता या पाटकर यांच्या ‘मेगापाई डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड’ या वाईन उत्पादक कंपनीमध्ये भागीदार असल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. संजय राऊत यांच्या मुलींनी या उद्योगात केलेल्या गुंतवणुकीबाबतही ईडी चौकशी करत आहे. या आधी ईडीने १ हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे आणखी एक निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. या जमीन घोटाळ्याचे धागेदोरे पाटकर यांच्याशी संबंधित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.