प्रकाश आंबेडकर यांचा छगन भुजबळ यांना सल्ला
वाशिम: प्रतिनिधी
एकीकडे सत्तेची पदे उपभोगायची आणि दुसरीकडे सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करायची असा दुटप्पीपणा चालणार नाही. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची ध्येयधोरणे मान्य नसतील तर इतर मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून दूर व्हावे. त्यामुळे त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त होईल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळ यांना दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांचा विराट समुदाय मुंबईच्या वेशीवर पोहोचताच राज्य सरकारने भल्या पहाटे अधिसूचना काढून आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन देणाऱ्या सरकारने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबांचा इतर मागासवर्ग आरक्षणात समावेश केल्याने आपली फसवणूक झाली आहे, अशी इतर मागासवर्गीय समाजाची भावना आहे. भुजबळ हे इतर मागासवर्गीयांचे दीर्घकाळ नेतृत्व करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाशी त्यांनी यापूर्वी असहमती व्यक्त केली आहे.
शिंदे यांची सरशी तर भाजप पडले फशी
भारतीय जनता पक्षाने इतर मागासवर्गीयांना गोंजारत राहायचे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन हाताळायचे, असा खेळ भाजप आणि शिंदे यांनी सुरू केला होता. या खेळात मुख्यमंत्री शिंदे यांची सरशी झाली आहे. शिंदे हे सध्या मराठा समाजासाठी सर्वोच्च नेते बनले आहेत. त्यांनी ठोकलेल्या षटकारामुळे इतर मराठा नेते निष्प्रभ ठरले आहेत, असे आंबेडकर म्हणाले.
दुसरीकडे, तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन देणाऱ्या भाजपची विश्वासार्हता इतर मागासवर्गीय समाजात संपुष्टात आली आहे. सत्ताधाऱ्यांकडून आपली फसवणूक झाल्याची भावना इतर मागासवर्गात तयार झाली आहे. मराठा समाजात भारतीय जनता पक्षाबाबत कोणतीच आस्था नाही. आता तर इतर मागासवर्गीयांनाही भाजपवर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीत भाजपचे मोठे नुकसान झाले आहे, असा दावाही आंबेडकर यांनी केला.