विकसित केला विघातक गुटख्याला आरोग्यदायी पर्याय
पुणे: प्रतिनिधी
मानवी शरीराला घातक आणि कृत्रिम रसायन युक्त पान मसाला आणि गुटखा चघळण्याचे व्यसन दूर करण्यासाठी आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून देणारे ‘गुडका’ हे उत्पादन विकसित करणारे तरुण संशोधक डॉ. राजस निजसुरे यांना या पदार्थाच्या उत्पादनाचे आणि उत्पादन प्रक्रियेचे पेटंट नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.
यापूर्वी त्यांना तंबाखू विरहित, औषधी वनस्पतीयुक्त सिगरेटच्या उत्पादनासाठी पेटंट मिळाले आहे. ‘गुडका’ या उत्पादनासाठी मिळालेले पेटंट हे डॉ. निजसुरे यांच्या ‘तंबाखूमुक्त भारत’ या संकल्पनेच्या दिशेने टाकलेले दुसरे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. चघळण्यासाठीचे उत्पादन आणि ते बनविण्यासाठी लागणारी प्रक्रिया या दोन्हीसाठी हे पेटंट मिळाले आहे.
आयुर्वेदिक उत्पादने केवळ पारंपारिक पद्धतीने तयार केली जात असून त्याला आधुनिक संशोधन आणि प्रमाणिकरण याची जोड नसल्याचा आक्षेप घेतला जातो. हे लक्षात घेऊन मूलभूत संशोधनाची रुची असल्याने डॉ. राजस यांनी बी ए एम एस बरोबरच औषधनिर्माण शास्त्राची पदविकाही प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधन आणि उत्पादनाला आधुनिक शास्त्राची बैठक प्राप्त झाली आहे.
गुडका हे अर्थातच अन्न व औषध प्रशासन विभागाची मान्यता असलेले उत्पादन असून त्यामध्ये औषधी वनस्पती वापरण्यात आल्या आहेत. त्यात सुपारी ऐवजी आवळा, बेलफळ वापरण्यात येत असून त्यावर ज्येष्ठमध, सुंठ, डाळिंब सालीचे चूर्ण, खदीर साल चूर्ण याचे लेपन करण्यात येते. त्याचप्रमाणे विशिष्ट स्वादासाठी मेंथोलयुक्त तेलाचा वापर केला जातो. गुडकाच्या नियमित सेवनामुळे पान मसाला आणि गुटखा यासारख्या विघतक सवयी दूर करण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे गुडका हे आयुर्वेदिक उत्पादन असल्याने ते न थुंकता गिळता येते. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याला हातभार लागतो.
नामांकित वैद्य अनंत निचुरे यांचा आयुर्वेदाचा अभ्यास व संशोधनाची परंपरा त्यांचे चिरंजीव उदय व नातू डॉ राजस यांनी निष्ठेने पुढे चालवली असून दीर्घकाळ संशोधन केल्यानंतर गुडका हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे. विविध निकष आणि चाचण्या पार केल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी त्याला पेटंट प्राप्त झाले आहे.
आरोग्य संपन्न समाज घडविण्यासाठी अनंत वेद रिसर्च लॅब च्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही डॉ राजस यांनी दिली आहे.