पुणे: प्रतिनिधी
यापूर्वी सर्व परिवहन कार्यालयात उपलब्ध असलेली वाहन चालविण्याचा परवाना, आर सी बुक यांचे स्मार्ट कार्ड प्रिंट करण्याची सुविधा केवळ विशिष्ट शहरांपुरती मर्यादित न ठेवता सर्व परिवहन कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
यापूर्वी चालक परवाना आणि आर सी बुक प्रिंट करण्याची व्यवस्था राज्यातील ५० परिवहन कार्यालयांमध्ये माटा कंपनीमार्फत उपलब्ध होती. मात्र राज्य शासनाच्या एका नव्या निर्णयामुळे ही सुविधा मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या परिवहन कार्यालयामध्येच देण्यात येणार आहे.
वाहन चालक आणि मालक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही सुविधा केवळ मर्यादित ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः पुणे परिवहन कार्यालयात त सर्वाधिक वाहन संख्या असूनही या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नाही.
ही सुविधा ठराविक कार्यालयांपुरती मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून पुण्यासह राज्यातील सर्व परिवहन कार्यालयात चालक परवाना आणि आरसी बुक प्रिंट करून स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात करावी, अशी विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.