
भ्रष्टाचार, बेरोजगारीचे निवारण आणि शिक्षणाचे सार्वत्रीकरण यासाठी करणार प्रयत्न
पुणे: प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक आणि पत्रकार डॉ सलीम बागवान हे देखील यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा अभाव या समाजासमोरील प्रमुख समस्या असून त्याचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉक्टर बागवान यांनी दिली आहे.
डॉ बागवान है उच्चविद्याविभूषित अभियंता असून भ्रष्टाचार निर्मूलन, मानवाधिकार अशा अनेक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना शंभरहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
निवडणुकीच्या राजकारणात राजकीय पक्षांचा सहभाग हेच भ्रष्टाचाराचे मूळ असून मतदारांनी अधिकारी अपक्ष उमेदवारांना निवडून दिल्यास भ्रष्टाचार आणि राजकारण्यांच्या मनमाणीला चाप लागेल, असा विश्वास डॉ बागवान व्यक्त करतात. आगामी काळात सत्तेवर येणाऱ्या सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी इंडिया इंडिपेंडेंट फ्रंट हा अपक्ष लोकप्रतिनिधींचा दबाव गट निर्माण करण्याची त्यांची योजना आहे.
बेरोजगारी ही देशापुढील दुसरी सर्वात गंभीर समस्या आहे. मात्र, नोकऱ्यांसाठी परकीय कंपन्यांवर अवलंबून न राहता बेरोजगारीचे शंभर टक्के निर्मूलन करणे शक्य आहे असा दावा डॉ बागवान यांनी केला. घरी किंवा पाहिजे त्या ठिकाणी बसून ऑनलाइन मार्केटिंग, कॉलिंग त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या वस्तूंचे प्रत्यक्ष उत्पादन करण्याचे काम बेरोजगार युवकांना उपलब्ध करून दिल्यास ते घरी बसून पन्नास हजार ते एक लाख रुपये महिना कमावू शकतील अशी योजना आपल्याकडे आहे, असा डॉ बागवान यांचा दावा आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शिक्षणाचे सार्वत्रीकरण करता येणे सहज शक्य आहे, असेही डॉ बागवान यांनी निदर्शनास आणून दिले. सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास समाजाच्या सर्व घटकांपर्यंत आवश्यक यंत्रणा पोहोचवून समाजाला शंभर टक्के सुशिक्षित करता येईल, यासाठीची योजनाही आपल्याकडे तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या मतदारसंघालाच नव्हे तर शासन व्यवस्थेला आणि देशाला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीने मतदारांनी आपल्याला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.