वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा उत्तर अमेरिकेतील मेरीलँड येथे उभारण्यात येत असून त्याचे अनावरण दिनांक 14 रोजी अमेरिकेसह जगभरातील डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. या पुतळ्याला statue of equality अर्थात समतेचा पुतळा असे नाव देण्यात आले आहे.
गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडविणारे विख्यात शिल्पकार राम सुतार यांनीच या पुतळ्याचे काम केले आहे. हा पुतळा तब्बल 19 फूट उंचीचा असणार आहे.
हा पुतळा उभारण्यात आलेल्या परिसरात 13 एकर जागेवर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर या नावाने डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकाच्या माध्यमातून डॉ आंबेडकर यांच्या कार्याची ओळख आणि विचारांचा प्रसार केला जाणार आहे. समता आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी या स्मारकाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.