शिरूर: प्रतिनिधी
नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेले चांगले की पलटीसम्राट आणि खोकेसम्राट, असा खोचक सवाल करीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टिकेवर पलटवार केला आहे.
आपल्या प्रचार मोहिमेत डॉ कोल्हे यांनी खेड तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी पवार यांचा खरपूस समाचार घेतला. पवार यांनी या मतदारसंघात एका सभेत बोलताना, तुम्हाला नटसम्राट खासदार हवा की कार्यसम्राट, असा सवाल करीत डॉ कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता.
मी आजपर्यंत अभिनयच्या क्षेत्रात जे काही कमावले ते स्वकर्तृत्वावर कमावले आहे. माझे काका नटसम्राट नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. अजित पवार मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदेतील कामाचा आढावा घ्यावा. त्यांच्यापेक्षा माझे काम निश्चित उजवे आहे, असा दावाही डॉ कोल्हे यांनी केला.
मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, पैसा हैं, हा संवाद जुना झाला. त्या धर्तीवर मला कोणी विचारले की, मेरे पास नेता हैं, सत्ता हैं,, पैसा हैं. तुम्हारे पास क्या हैं, तर मी प्रांजलपणे सांगीन की, माझ्याजवळ शिरूर मतदारसंघातील मायबाप जनता आहे, असेही त्यांनी नमूद केले.