
पुणे: प्रतिनिधी
ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर छापा घालून सक्तवसुली संचालनालयच्या पथकाने झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. ईडीच्या मुंबई येथील पथकाने आज पहाटेपासून ही कारवाई सुरू केली आहे.
डीएसके यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी त्यांना तब्बल पाच वर्ष तुरुंगाची हवा खावी लागली. सध्या ते जामीनावर बाहेर आले आहेत.
डीएसके यांच्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या तब्बल 35 हजार गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये थकित आहेत. कंपनीच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डीएसके यांच्या एकूण 195 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आले आहेत. या मालमत्तांपैकी लिलाव करण्यायोग्य मालमत्तांची यादी तयार करण्याचे y मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.