पत्रकार मारहाण प्रकरणी आरोपी तडीपार करणार
पुणे : प्रतिनिधी
वाहन पुढे घेण्याच्या कारणावरुन खेड शिवापुर टोल नाक्यावर पत्रकारास बेदम मारहाण करणाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर तडीपार कारवाई करण्याचे आश्वासन पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकीत गोयल यांनी दिले. तसेच संबंधित टोल नाक्यावरील गुंडगिरीचा कायमस्वरुपी बंदोबस्त केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सातारा रस्त्याने गाडी पुढे नेल्याच्या किरकोळ कारणातुन खेड शिवापुर टोल नाका येथे दोघांनी पत्रकारास जबर मारहाण केली. 23 जून रोजी रात्री आठ वाजता ही घटना घडली. सूरज सुनील कोंडे व नितीन चंद्रकांत कोंडे (दोघेही रा. खेड शिवापूर, ता. हवेली) अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील बापट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सरचिटणीस पांडुरंग सरोदे, उमेश शेळके, शैलेश काळे, योगिराज प्रभुणे, विश्वजीत पवार उपस्थित होते. आरोपींना तत्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, खेड शिवापूर टोल नाक्यावर प्रवाशांना अडवून शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोयल यांच्याकडे करण्यात आली.
गोयल म्हणाले, संबंधित टोल नाक्यावरील लोकांककडून नागरीकांना त्रास दिला जात असल्याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. पत्रकाराला झालेल्या मारहाणीची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे.