
पुणे: प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांचे आज पहाटे वृद्धापकाळने निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. ग्रामीण भागाचे चित्रण करणाऱ्या पाचोळा या कादंबरीने त्यांचे नाव साहित्य वर्तुळात व वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यामुळे त्यांना पाचोळाकार या नावाने ओळखले जाऊ लागले.
लातूर जिल्ह्यातील काटेगाव या अत्यंत मागासलेल्या खेडेगावात शेतकरी कुटुंबात बोराडे यांचा जन्म झाला. चौथीनंतर शिक्षणासाठी ते बार्शी येथे गेले. त्यानंतर सोलापूर आणि औरंगाबाद येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
सन 1957 मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास शेवटपर्यंत सुरू राहिला. अत्यंत सोपे आणि रसाळ भाषेत विशेषतः ग्रामीण भागातील जनजीवन त्यांनी आपल्या लेखनातून मांडले.
पेरणी, ताळमेळ, मळणी, चाळवण, , बोळवण, वरात, फजितवाडा, खोळंबा, बुरुज, नातीगोती, हेलकावे, फणस आणि कडबा असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. यामध्ये बोराडे यांनी विशेषतः मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील जीवनाचे चित्रण केले आहे.