अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांनी घोषित केलेला अखिल भारतीय स्तरावरील “आदर्श संगीत शिक्षक पुरस्कार” नगरमधिल ज्येष्ठ संगीतज्ञ, संस्कृतपंडित, महामहोपाध्याय डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित संपूर्ण सभागृहाने स्टॅंडिंग ओव्हेशन देऊन टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्त अशी सलामी दिली. यावेळी सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने डाॅ.खरवंडीकर यांचा तसेच प्रमुख अतिथी डाॅ.कशाळकर यांचा मानपत्र, पुणेरी पगडी, मोतीमाळ, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
सरगमप्रेमी मित्र मंडळ अ.नगर आणि अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली सभागृहात आयोजित “सन्मान गुरुशिष्य परंपरेचा” या कार्यक्रमामध्ये नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष तसेच ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याचे गायक, ज्येष्ठ गुरू पं. विकास कशाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी त्यांचेसह व्यासपिठावर गांधर्व मंडळाचे उपाध्यक्ष पं.पांडुरंग मुखडे, सचिव श्री.बाळासाहेब सूर्यवंशी, कोषाध्यक्ष डॉ.किशोर देशमुख, परिक्षा समिती संयोजक पं.रामराव नायक, रजिस्ट्रार पं.विश्वास जाधव, पंडिता विदुषी शुभदा पराडकर, सरगमप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.राम शिंदे, तसेच अन्य संचालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्येष्ठ गायिका शुभदाताई पराडकर यांच्या शिष्या सौ.मानसी कुलकर्णी-देशपांडे यांचे शास्त्रीय गायन सादर झाले. त्यांनी सुरुवातीला विलंबित झुमरा तालामध्ये मारवा रागामधिल ख्याल “झनझनननन पायल बाजे” आणि द्रुत एकतालामध्ये “लागी लगन गुरु पायी, सकल जगत बिसरायी” या द्रुत बंदिशीचे अतिशय भावपूर्णपणे सादरीकरण केले. त्यानंतर त्यांनी साडे आठ मात्रेपासून सुरु होणारी नंद रागामधील “सब मिल गावो बजाओ” ही मध्यलय झपतालातील नजाकतदार बंदिश सादर केली. त्याला जोडून आडमात्रेने आणि तालाच्या अंगाने जाणारी तीनतालातील “ऐसो निपट निडर सावरिया” ही बंदिश नजाकतीने पेश केली. त्यांनी सादर केलेल्या सर्व बंदिशी सुश्री. शुभदाताई पराडकर यांनी रचलेल्या होत्या. त्यांच्या शास्त्रीय गायनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या गायिका, पं. गजाननबुवा जोशी आणि पं. बबनराव हळदणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या विदुषी शुभदाताई पराडकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर झाले. त्याची सुरुवात त्यांनी त्यांचे गुरु पं.बबनराव हळदणकर यांनी वेगळ्या चलनाने रचलेल्या नटकामोद रागामधील तिलवाडा तालात बांधलेल्या “मोरा मन हरलीनो” या बंदिशीने, तर त्यानंतर याच रागातील तीनतालात बांधलेल्या “एक नाम जपत सब गोविंद” या बंदिशीने केली. त्यानंतर त्यांनी त्यांचे गुरू पं. गजाननबुवा जोशी यांनी रचलेली काफी कानडा मधील “सावरिया तोरे बिन मोहे..” ही बंदिश सादर करीत रसिकांना आपल्या घराणेदार गायकीने मंत्रमुग्ध केले. मैफिलीचा शेवट त्यांनी उज्जैन चे ज्येष्ठ गायक पं.बाळासाहेब वाघ मास्तर यांनी शिकवलेला, आद्धा त्रितालात बांधलेला भैरवी रागातील “मानिजे बसंत..” हा टप्पा आणि तराणा घेऊन केला, त्याला रसिकांची उत्तम दाद मिळाली. या गुरु शिष्य सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने रसिकांना गुरु शिष्य परंपरेतील पारंपरिक आणि घरंदाज गायकीची अनुभूती मिळाली.
या दोन्हीही कलाकारांना श्री.मकरंद खरवंडीकर यांनी संवादिनीची आणि श्री.धनंजय खरवंडीकर यांनी तबल्याची, तर आदिती कोरटकर आणि सावनी गोगटे यांनी तानपुरा संगत केली.
संगीत क्षेत्रातील गुरुजनांचा आदर्श गुरू पुरस्कार आणि गुरू-शिष्यांची मैफल ही एक अनोखी मुहूर्तमेढ गांधर्व महाविद्यालयाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोवली गेली. यावेळी अनेक संगीत शिक्षक, त्यांचा शिष्यगण आणि अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होता. संगीत क्षेत्रातील एक हरहुन्नरी समिक्षक श्री.सुहासभाई मुळे यांनी डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांची मुलाखत घेतली. सरगमचे अध्यक्ष श्री.राम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. गांधर्वचे डाॅ.किशोर देशमुख आणि पं.पांडूरंग मुखडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गांधर्व मंडळाचे अध्यक्ष डॉ.विकास कशाळकर यांनी मंडळाची भूमिका मांडली. श्री.मनिष बोरा यांनी आभार मानले तर सौ.भावना कासवा-बोरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.चिन्मय सुखटणकर, डाॅ.प्रकाश कांकरिया आणि श्री.धनेश बोगावत, श्री.अभय जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले. सरगमप्रेमी आणि श्रुती संगीत चे सदस्य, प्रसिद्ध गायक श्री.अंगद गायकवाड, अंजली गायकवाड, पवन नाईक, चंद्रकांत पंडित, अपर्णा बालटे, संस्कार भारतीचे दीपक शर्मा, विलास बडवे, कीर्तीदेवी खरवंडीकर, कुमुदिनी बोपर्डीकर, डाॅ.धनश्री खरवंडीकर, बंदिशीचे लक्ष्मणराव डहाळे, अविनाश देऊळगावकर, प्रकाश कुलकर्णी, के.डी.खानदेशी, सर्वोत्तम क्षीरसागर, प्रा.श्रीकृष्ण लांडगे, वर्षा पंडित, प्रसाद सुवर्णापाठकी आणि अन्य अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.