मुंबई 7 जून: पत्रकारिता क्षेत्रातील एक मोठं नाव अर्थात ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं.ते 64 वर्षांचे होते.
त्यांच्या भारदस्त आवाजासाठी आणि वृत्तनिवेदनाच्या विलक्षण पद्धतीसाठी ते ओळखले जात होते. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने पत्रकारिता क्षेत्रात दुःखाचं वातावरण पसरलं आहे.
दूरदर्शवरील खणखणीत आणि बुलंद आवाज अशी त्यांची ओळख होती. दूरदर्शनचा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा पैलू निखळला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. ज्या काळात डिजिटल साधन सोडा साधी 24 तास बातम्या सांगणारी वाहिनी उपलब्ध नव्हती तेव्हा प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनवर बातम्या व्यवस्थित पद्धतीने पोहोचवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
1972 मध्ये त्यांनी आपल्या दूरदर्शनमधील कारकिर्दीला सुरवात केली तर 1974 साली अधिकृतपणे वृत्तनिवेदनाची धुरा हाती घेतली. त्यानंतर पुढे अनेक वर्ष सातत्याने ते वृत्तनिवेदक म्हणून यशस्वीपणे काम करत होते. देशभरातील आणि राज्यभरातील खूप महत्त्वाच्या बातम्या जगापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं.